Monday, January 30, 2017

मी तुझ्या हृदयात होतो...

मी तुझ्या हृदयात होतो...

रोज होतो, गात होतो, मी तुझ्या हृदयात होतो;
तू नशेने झिंगताना चोंदल्या हृदयात होतो ! 

बोलणे माझे जरासे का तुला चिडणे दिसावे ?
"स्वार्थचित्ते आन्धळा तू" , सांगण्या हृदयात होतो !

कोण केव्हा प्रेम देते, बांधल्यांचे "हात" होते,
हास्य तेव्हा ते तुझे मी झेलण्या हृदयात होतो !

आन्दणे तू मागताना, बाह्यरंगी रंगताना
मी बनूनी आत्मतेजा तेवण्या हृदयात होतो !

गर्वयोगे ऊंच माथा, गायिली तू "स्वस्व" गाथा,
"नम्रता येवो जराशी" चिन्तण्या हृदयात होतो !

 रूप माझे वेगळे, मायाप्रवाही ना कळे रे,
आत्मज्ञानाची बिजे मी पेरण्या हृदयात होतो !

आसवी वाहो अहंता, फ़ोल "माये"ची महत्ता
जाणता हे, त्या प्रभूचा जन्म ह्या हृदयात होतो !

---प्रभा.
.

Sunday, January 29, 2017

कधीच नाही......

.
कधीच नाही......

मी फ़ारशी इथेही जगले कधीच नाही,
जे चार तास जगले, विस्मरले कधीच नाही !

धावून कष्ट झाले, टोचून रक्‍त आले,
मी सोसले कळांना, स्मरले कधीच नाही !

कष्टास " कष्ट " म्हणूनी त्रास होई तेव्हा
त्यालाच " गोड " म्हटले, रडले कधीच नाही !

सामोरल्या उतारा फ़ोफ़ावत्या प्रवाही
झोकून मात्र देणे "चढले " कधीच नाही !

कोणा अचूक कळतो, सूर धावत्या जगाचा,
मी रम्य जागी रमले, ढळले कधीच नाही !

माझे मला लुभावे, विजनात शोध घेणे,
हे वेड मात्र लोकां रूचले कधीच नाही !

प्रभा.
.

सरडा

.
सरडा
.

एकदा एक सरडा गवताच्या रंगात बदलत असताना त्याला तलावाच्या नितळ पाण्यात स्वत:चं प्रतिबिम्ब दिसलं.पुढे कधी ताम्बड्या मातीतून, कधी पिवळ्या पाचोळ्यातून सरपटताना स्वत:मधला बदल निरखायची सवय लागून गेली त्याला. एक दिवस त्याचाच त्याला प्रश्न पडला, "माझा खरा रंग आहे तरी कुठला ?" तो विचार करू लागला ----
.
"तो मी नव्हेच" म्हणताना ह्यातला "तो" कोण ? असा प्रश्न पडण्याइतकी रूपं बदलणं खरंच श्रेयस्कर आहे ?
.
त्याला उत्तर मिळालं की नाही, कुणास ठाऊक. मला मात्र वाटतं, सरडा निदान स्वसंरक्षणासाठी निसर्गत: रंग बदलतो. गम्मत म्हणून रूपं बदलणार्‍या मानवी सरड्यांना हा प्रश्न कधीच पडत नसेल ??????
.
प्रभा.
.

In the silence of the heart

In the silence of the heart

The heart of a mother
goes to the child
the heart of a mother
feels the vibes

She may speak out
or may keep mum
lest the pain aggravates
for the one who once was in womb

It was then, that the mother
could take full care
The precious piece of body & soul
was given her to treasure

Why does life move on
Why time stops not ?
Why have we to go on
doing the compulsory march past ?

And still the life goes on...
be there storm or dew ----
A mother can bless & pray
for smiles on child's lips to continue !!

--prabha

एक पणती

एक पणती

एक पणती, इवली ज्योती
आपल्या हृदयात तेवत असते
येणारा वार्‍याचा झोत वा झुळुक
स्वत:वर ती झेलत असते.

दिसलं दु:ख डावलून आपण
आपल्यातच रमतो तेव्हा
तिची थरथर जाणवत असते
किंचित्‌ स्नेह टपकत असते.

न पटणारं आपण वागतो,
भीड-भाड संभाळत बसतो
तिची वात स्खलत असते
निमूट तरी ती तेवत असते.

कुणाचे वार थेट हृदयावर,
चूक आपली काहीच नसते
तेव्हा चटकन तेजस्वी झोतात
तीच आपल्याला सावरत असते.

जीवन हरून दु:खित आप्‍त
आपल्यापाशी बळ मागतात
खंबीर हसवून फ़ुलत असते
बलिष्ट होत तेवत असते.

आपलं विसरून दोन अश्रू 
जेव्हा ढळतात दुसर्‍यासाठी
तिची उंची वाढत असते
प्रभा तिची पसरत असते.

एक पणती, तिची ज्योती
लहान-मोठी होत असते
जीवनाची साथ असते...
परलोकाची वाट असते !!

--प्रभा.
०६.११.२०१०.
 .

मैत्री

एक दिलासा, एक विसावा
शक्ती मनाची मैत्री म्हणजे
पडतानाही सावरण्याला
आधार न का मैत्री म्हणजे ?

ह्रृद्य साठवण, शीतल पखरण
खराच खजिना मैत्री म्हणजे
भाग्यवान मी, किती चिंबले
रिमझिम पाऊस मैत्री म्हणजे !

प्रभा
२९.०१.२०१७