एक पणती
एक पणती, इवली ज्योती
आपल्या हृदयात तेवत असते
येणारा वार्याचा झोत वा झुळुक
स्वत:वर ती झेलत असते.
दिसलं दु:ख डावलून आपण
आपल्यातच रमतो तेव्हा
तिची थरथर जाणवत असते
किंचित् स्नेह टपकत असते.
न पटणारं आपण वागतो,
भीड-भाड संभाळत बसतो
तिची वात स्खलत असते
निमूट तरी ती तेवत असते.
कुणाचे वार थेट हृदयावर,
चूक आपली काहीच नसते
तेव्हा चटकन तेजस्वी झोतात
तीच आपल्याला सावरत असते.
जीवन हरून दु:खित आप्त
आपल्यापाशी बळ मागतात
खंबीर हसवून फ़ुलत असते
बलिष्ट होत तेवत असते.
आपलं विसरून दोन अश्रू
जेव्हा ढळतात दुसर्यासाठी
तिची उंची वाढत असते
प्रभा तिची पसरत असते.
एक पणती, तिची ज्योती
लहान-मोठी होत असते
जीवनाची साथ असते...
परलोकाची वाट असते !!
--प्रभा.
०६.११.२०१०.
.
No comments:
Post a Comment